मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन
पुणे, 08 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संय
grdf


पुणे, 08 जुलै (हिं.स.) :

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'फिरता वारकरी दवाखाना' उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऊन, वारा, पाऊस, तहान-भूक यांची पर्वा न करता चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाचीच सेवा आहे. अशा पुण्यकार्यात सहभागी होण्याचे समाधान लाभत आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस भवन येथे झालेल्या कार्यक्रमास पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, ॲड. अविनाश साळवे, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ. राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, अधिष्ठाता डॉ. शशीधर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोहोळ यांनी सांगितले की, राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे. ज्ञानदानाबरोबरच समाजाप्रती असलेले भान जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत, वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा असल्याचे सांगितले. पुणे महानगरपालिकेच्या वतीनेही वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी वारीतील सेवा ही पांडुरंगाचा आशीर्वाद असल्याचे सांगत, देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि मानवतेचे शिक्षण देणारा असल्याचे मत व्यक्त केले.

उपक्रमाची माहिती देताना ॲड. अविनाश साळवे यांनी सांगितले की, २००१ मध्ये एका अँब्युलन्सपासून सुरू झालेल्या या सेवेत यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलन्स, दुचाकी अँब्युलन्स तसेच ३०० हून अधिक डॉक्टर, नर्स आणि स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. प्रथमोपचार, औषधे, वेदनाशामक उपचार आणि आपत्कालीन आरोग्यसेवा वारकऱ्यांना वारीदरम्यान उपलब्ध करून दिली जाणार आहे.

माजी आमदार उल्हास पवार यांनी वारी हा विचार, विवेक आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम असल्याचे सांगत, वारकऱ्यांची सेवा ही ईश्वरभक्तीची अनुभूती असल्याचे नमूद केले.

प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी वारी ही स्वयंशिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता आणि सामाजिक समरसतेचा आदर्श असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी वारीचा अनुभव घेण्याबरोबरच त्यावर संशोधन करण्याचे आवाहन केले.

गेली २६ वर्षे सातत्याने सुरू असलेला हा 'फिरता वारकरी दवाखाना' उपक्रम यंदाही हजारो वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा आधार देणार असून वारकरी संप्रदायासाठी ही सेवा अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवती पाठक यांनी, तर आभार प्रदर्शन सुधीर दरोडे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande