
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)।
शासनाची अधिकृत मान्यता नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ खासगी इंग्लिश मीडियम शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये सोलापूर शहरातील आठ, तर दक्षिण सोलापूर, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या शाळांनी शासनाची मान्यता मिळण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षण सुरू केले असून काही ठिकाणी डोनेशन घेऊन प्रवेश दिल्याचाही आरोप आहे.
या शाळांवर कारवाई करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जुलै २०२५ पासून आतापर्यंत तब्बल ११ वेळा गटशिक्षणाधिकारी आणि प्रशासनाधिकाऱ्यांना लेखी आदेश व पत्रे पाठविली आहेत. मात्र, प्रत्यक्षात संबंधित शाळांवर प्रभावी कारवाई झालेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासणीसाठी अधिकारी भेट दिल्यानंतर संबंधित शाळांचे व्यवस्थापन मान्यतेचा प्रस्ताव सचिव, शिक्षण संचालक किंवा शिक्षण आयुक्तांकडे प्रलंबित असून लवकरच मान्यता मिळेल, असे स्पष्टीकरण देत आहे. या कारणामुळे कारवाईची प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, महापालिकेचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी शहरातील काही विनामान्यता शाळांवर कारवाई करून त्या बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, अद्यापही अनेक शाळा विनामान्यता सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिक्षण क्षेत्रातील या प्रकारामुळे शासनाच्या मान्यता प्रक्रियेची अंमलबजावणी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि विनामान्यता शाळांवर होणाऱ्या कारवाईच्या प्रभावीतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड