
पुणे, 08 जुलै (हिं.स.)।
लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल यांच्या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे डिजिटल पुरावे लागले असून, या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कुटुंबीयांपासून लपवून काही महिन्यांपूर्वी गुप्तपणे विवाह केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ला येथे केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईल फोनमधील मागील सहा ते सात महिन्यांचे कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स आणि इंटरनेट सर्च हिस्ट्री यांचे सखोल विश्लेषण केले. या डिजिटल पुराव्यांच्या तपासातून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता गुप्तपणे विवाह केल्याचे समोर आल्याचे तपास सूत्रांनी सांगितले.
पोलिस या डिजिटल पुराव्यांच्या आधारे हत्या कटाची पार्श्वभूमी, आरोपींच्या हालचाली आणि परस्पर संपर्काचा अधिक तपशील तपासत आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु