खडकवासला धरण ९४ टक्के भरले; २७ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू
पुणे, 08 जुलै, (हिं.स.)। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीच्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण ९४ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा व
Dam


पुणे, 08 जुलै, (हिं.स.)। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीच्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला धरण ९४ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला ८५० क्युसेस विसर्ग करण्यात आला. त्यानंतर तो अनुक्रमे १,७००, ३,५००, ६,५००, १४,५०० आणि सध्या २७ हजार २०३ क्युसेस इतका वाढविण्यात आला आहे. पावसाची तीव्रता आणि धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन विसर्गात आणखी वाढ केली जाऊ शकते, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यालगतच्या काही भागांमध्ये पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः एकता नगर आणि विठ्ठल नगर परिसर संभाव्य बाधित क्षेत्र म्हणून ओळखले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी बुधवारी पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर आणि विठ्ठल नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande