
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौंडेश्वरवाडी येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेची ओळख उषा विजय साठे अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्या शेतात काम करत असताना सचिन देशमुख हा घटनास्थळी आला आणि त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात उषा साठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा तसेच प्राथमिक तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून, गोळीबारामागील कारण, आरोपीची भूमिका आणि घटनेची पार्श्वभूमी याचा सखोल तपास केला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे चौंडेश्वरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड