
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)।
प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत मराठी भाषा प्रमाणपत्राच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात जन्मलो, मराठीत शिक्षण घेतले, मराठी बोलता येते, मग प्रमाणपत्र कशासाठी? सरकारचे हे धोरण केवळ मुस्लिमांसाठी आहे का? असा सवाल काही चालकांनी उपस्थित केला.
या प्रश्नांना उत्तर देताना उपस्थित मान्यवरांनी, आपण सर्व आमचे बंधू आहात. मराठी भाषेवरील प्रेम आणि व्यवहारात तिचा अधिक वापर व्हावा, यासाठी राज्य सरकारने हा कायदा केला आहे. या नियमात कोणत्याही समाज किंवा धर्माविरोधात भेदभाव नाही, असे स्पष्ट करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
१६ ऑगस्टपासून प्रवाशांशी मराठीत संवाद न साधणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी (७ जुलै) प्रादेशिक परिवहन कार्यालयात 'महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा' अभियानांतर्गत मराठी भाषा शिकवणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत डॉ. ज्योती ठाकरे यांनी अमराठीची व्याख्या स्पष्ट करत सांगितले की, महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी ज्याची मातृभाषा किंवा बोलीभाषा मराठी नाही, तो अमराठी समजला जातो. महाराष्ट्राने सर्वांना आपलेसे केले असून अनेकांची उपजीविका याच भूमीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रवासी कोणत्याही भाषेचा असला तरी त्याच्याशी मराठीत संवाद साधणे अपेक्षित आहे. यासाठीच अमराठी वाहनचालकांसाठी मराठी भाषा अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
यावेळी रिक्षाचालक रियाज सय्यद यांनी, आम्हाला मराठी येते, मग प्रमाणपत्राची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी हा राज्य सरकारचा कायदा असून त्याचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच नावाच्या आधारे अमराठी चालकांची ओळख पटवून नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले. या मुद्द्यावर काही काळ कार्यशाळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड