

रायगड, 08 जुलै (हिं.स.)। : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. विशेषतः अलिबाग तालुक्यातील उसर उपकेंद्राअंतर्गत वावेसह परिसरातील अनेक गावांमध्ये वीज खांब, रोहित्रे आणि वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने काही काळ संपूर्ण परिसर अंधारात गेला होता. मात्र, महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र मेहनत घेत ९९ टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे.
हवामान विभागाने ४ ते ६ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यानुसार जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहिले. या काळात वावे परिसरातील अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वीजवाहिन्यांवर ती कोसळली. परिणामी अनेक लघुदाब व उच्चदाब वीजवाहिन्या तुटल्या, तर अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले किंवा झुकले. त्यामुळे अनेक गावे आणि वाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला.
या नैसर्गिक आपत्तीत सुमारे २० वीज खांब, दोन रोहित्रे, १५ ठिकाणी वीजवाहिन्या तसेच सात अतिरिक्त खांबांचे नुकसान झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने बाधित रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. फणसापूर शाखेचे कनिष्ठ अभियंता विश्वजीत महाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पथकाने भर पावसात, चिखल आणि पाणी साचलेल्या परिसरातही दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवली. कोसळलेले खांब उभे करणे, तुटलेल्या तारा जोडणे, वीजवाहिन्या पूर्ववत करणे आणि रोहित्रे कार्यान्वित करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले.
महावितरणच्या अथक प्रयत्नांमुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून सध्या ९९ टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी झुकलेले खांब सरळ करणे, नुकसानग्रस्त वाहिन्यांची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी नागरिकांना कमीत कमी काळ अडचण यावी यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता सातत्याने कार्यरत आहेत. उर्वरित भागातही लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)