मोशीत इमारत कोसळल्याने खळबळ; अग्निशमन दलाकडून बचावमोहीम सुरू
पुणे, 08 जुलै (हिं.स.)। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोशी परिसरात मोठी दुर्घटना घडली असून, मोशी कचरा डेपोला लागून असलेली एक इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, अग्निशमन दल आणि प्रशासनाकडू
fgdf


पुणे, 08 जुलै (हिं.स.)।

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोशी परिसरात मोठी दुर्घटना घडली असून, मोशी कचरा डेपोला लागून असलेली एक इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत १४ ते १५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, अग्निशमन दल आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा मोठा ढिगारा घसरून इमारतीवर आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. इमारत कोसळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावमोहीम सुरू आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अद्याप या दुर्घटनेतील जीवित किंवा वित्तहानीबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे मोशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande