
पुणे, 08 जुलै, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरात पूरस्थिती आणि इतर आपत्कालीन परिस्थितींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी महापालिकेकडून विभागनिहाय सर्वंकष आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. शहराची भौगोलिक रचना, नैसर्गिक नाले, पर्जन्यमान आणि वातावरणीय बदलांचा सखोल अभ्यास करून हा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडविणारी अतिक्रमणे किंवा अडथळे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रम बगाडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी मुसळधार पावसाच्या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीतून मिळालेल्या अनुभवांचा अभ्यास करून भविष्यातील नियोजन अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत पूरनियंत्रणासाठी आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, क्षेत्रनिहाय प्रतिसाद व्यवस्था आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील काही भागांमध्ये नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अतिक्रमणांमुळे बाधित झाल्याने पाणी साचल्याचे निदर्शनास आल्याने सर्व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच एमआयडीसी परिसरातील नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु