वृद्ध दाम्पत्य हत्याकांडात मोठी प्रगती; मुंबईतून आरोपीला अटक, २२.७४ लाखांचे दागिने जप्त
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। कृष्णानगर, कुमठा नाका परिसरातील वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाच्या तपासात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश मिळाले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या या दुहेरी हत्येनंतर घरातील लाखो रुपयांचे स
grdf


सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। कृष्णानगर, कुमठा नाका परिसरातील वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाच्या तपासात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश मिळाले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या या दुहेरी हत्येनंतर घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिनेही लंपास करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी इंदापूर येथील एका आरोपीला मुंबईतून अटक केली असून, त्याच्याकडून २२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कृष्णानगर, कुमठा नाका येथे राहणारे महादेव पांडुरंग मंचाळ आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा महादेव मंचाळ यांना अपत्य नव्हते. त्यांच्या मालमत्तेवरून नातेवाईकांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू होता. याच वादातून १५ मार्च २०२६ रोजी त्यांच्या दोन सख्ख्या पुतण्यांनी राहुल रामचंद्र मंचाळ (वय २६) आणि विकास रामचंद्र मंचाळ (वय २३) यांनी काका-काकूची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरले होते. मुख्य आरोपी विकास मंचाळ याने हे दागिने त्याचा मित्र साहिल दादा शेख (रा. इंदापूर, जि. पुणे) याच्याकडे लपवण्यासाठी दिल्याचे उघड झाले.

या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी मुंबईत कारवाई करत साहिल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि इतर मिळून २२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात दोषारोपपत्र आधीच दाखल झाले असले तरी नव्याने समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande