
पुणे, 08 जुलै, (हिं.स.)। मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे पुणे शहरात अवघ्या २४ तासांत १२१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शहरातील १२६ ठिकाणी पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. धोक्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने कारवाई करत १,०४० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक २०६.५० मि.मी. पाऊस झाला. त्यापाठोपाठ औंध-बाणेर परिसरात २०३.५० मि.मी., तर कात्रज-कोंढवा भागात १८६.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. या भागांसह शहरातील अनेक सखल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
नांदेड फाटा येथील शांतिनिकेतन परिसर, हडपसर, बोपोडी, वारजे, बाणेर आणि इतर पूरग्रस्त भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. स्थलांतरितांसाठी महापालिकेने विविध शाळा, समाजमंदिरे आणि सार्वजनिक इमारतींमध्ये तात्पुरती निवारा केंद्रे उभारून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली आहे. मदतकार्यात ५० स्वच्छता निरीक्षक, ५० स्वच्छता पर्यवेक्षक, सुमारे ४ हजार सफाई कर्मचारी, ५० फवारणी कर्मचारी, ४०० मुकादम आणि १४० विशेष पथके कार्यरत आहेत.
याशिवाय २२ पोकलेन, ६७ जेसीबी, २९ डंपर, ४ रोबो, ३ जेटर आणि ९ पाण्याचे टँकर यांच्या साहाय्याने पाणी उपसा, रस्ते मोकळे करणे, चिखल हटविणे आणि अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सतत कार्यरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु