
पुणे, 08 जुलै (हिं.स.)।
संततधार पावसामुळे बुधवारी सकाळी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत झाली. कार्यालये, महाविद्यालयांची वेळ आणि पावसामुळे रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. परिणामी अनेक वाहनचालकांना नेहमीपेक्षा ३० ते ४५ मिनिटे अधिक वेळ प्रवासासाठी खर्च करावा लागला.
गुगल मॅपवरील लाइव्ह ट्रॅफिकनुसार मध्यवर्ती पुण्यासह पूर्व, पश्चिम आणि उपनगरांतील अनेक प्रमुख मार्गांवर वाहने संथगतीने सरकत होती. सकाळी आठ ते अकरा या वेळेत वाहतुकीवरील ताण सर्वाधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, शिवाजीनगर परिसरातील जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिराजवळ मोठे झाड कोसळल्याने हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू केले.
या काळात वाहतूक डेक्कन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, संभाजी उद्यान परिसर आणि शिवाजीनगर मार्गे वळविण्यात आली. मात्र पर्यायी मार्गांवरही वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
गुगल मॅपवरील वाहतूक स्थितीत शहरातील अनेक प्रमुख रस्ते लाल आणि गडद लाल रंगात दिसत होते. अनेक चौकांमध्ये वाहनांना सिग्नल पार करण्यासाठी दोन ते तीन सिग्नलची प्रतीक्षा करावी लागत होती.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात केले होते. तसेच झाड कोसळलेल्या ठिकाणी महापालिका, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे काम करत मार्ग शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु