
पुणे, 08 जुलै (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात राजकीय पक्षांनी सक्रिय आणि निष्ठापूर्वक सहकार्य करावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस तहसीलदार शीतल मुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनल पीपल्स पार्टी आदी पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहर प्रमुख, सचिव आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
मीनल कळसकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात ९० लाख ८० हजार गणना अर्जांचे वाटप करण्यात येणार असून हे काम २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला दोन सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांचे सहकार्य आवश्यक आहे.
त्या म्हणाल्या, पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदारांचा पत्ता व संपर्क क्रमांक अद्ययावत केला जात आहे. त्यामुळे एकाच पत्त्यावरील मतदारांचे एकाच मतदान केंद्रात नियोजन करणे सुलभ होणार असून भविष्यात मतदान केंद्रांचे अधिक प्रभावी सुसूत्रीकरण करता येईल.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांची माहिती संकलित करण्यात येत असल्याने अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत आपोआप समाविष्ट होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांची नावे काळजीपूर्वक तपासावीत, जेणेकरून पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे मीनल कळसकर यांनी सविस्तर निरसन केले. तसेच २९ जुलैपर्यंत गणना अर्ज वाटपाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु