ठाण्यात पावसाचा हाहाकार; हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर होणार थेट कारवाई!
ठाणे, 08 जुलै (हिं.स.) - जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. ठिकठिकाणी झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळणे, तसेच धोकादायक होर्डिंग्ज आणि पत्रे उडण्याच्या
ठाण्यात पावसाचा हाहाकार; हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर होणार थेट कारवाई!


ठाणे, 08 जुलै (हिं.स.) - जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. ठिकठिकाणी झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळणे, तसेच धोकादायक होर्डिंग्ज आणि पत्रे उडण्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कुठेही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्टेशन परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक किंवा वाळलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून त्यांची छाटणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, वीज तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या महावितरणच्या समन्वयाने त्वरित हटवण्यास सांगितले आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले असून तिथे आवश्यक औषधे, रक्तसाठा, डॉक्टर आणि परिचारिकांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे आदेश आहेत. आपत्कालीन उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिका आणि स्थानिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच एक स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.

सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे सक्शन पंप, जनरेटर, जेसीबी आणि क्रेन यांसारखी यंत्रसामग्री नेहमी कार्यरत ठेवणे बंधनकारक केले आहे.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व जाहिरात फलक (होर्डिंग्ज), एलईडी स्क्रीन, स्वागत कमानी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा जाळ्यांची कडक तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणारे आणि असुरक्षित फलक तातडीने निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तास नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून क्षेत्रात उपस्थित राहणे अनिवार्य केले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande