सेट परीक्षा पुढे ढकलली; आता ६ सप्टेंबरला होण्याची शक्यता
पुणे, 08 जुलै (हिं.स.)। सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली ४१ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी २६ जुलै रोजी प्रस्तावित असलेली ही परीक्षा आता ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता असून, याबाबतची माहिती सावित्रीबाई
University Pune SPUU


पुणे, 08 जुलै (हिं.स.)। सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली ४१ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी २६ जुलै रोजी प्रस्तावित असलेली ही परीक्षा आता ६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता असून, याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी तसेच पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या SET परीक्षेचे आयोजन यंदाही विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सरळसेवा भरतीअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे SET आणि MPSC या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यास उमेदवारांना एका परीक्षेची निवड करावी लागून त्यांचे शैक्षणिक व स्पर्धात्मक नुकसान होण्याची शक्यता होती.

याशिवाय, ७ जुलै ते २५ जुलै या कालावधीत सुरू असलेल्या आषाढी वारीमुळे राज्यातील अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत २६ जुलै रोजी परीक्षा घेतल्यास उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, ६ सप्टेंबर ही संभाव्य परीक्षा तारीख असून अंतिम वेळापत्रक आणि अधिकृत अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande