चरबी वापरल्याच्या आरोपानंतर एफडीएची कारवाई; सोलापुरातील दाल-चावल विक्रेत्यांची तपासणी सुरू
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। शहरातील २०० हून अधिक हातगाड्यांवर दाल-चावलची विक्री होत असली, तरी बहुतांश ठिकाणी हा पदार्थ शाकाहारी की मांसाहारी याची स्पष्ट माहिती देणारा फलक नसल्याचे समोर आले आहे. दररोज हजारो नागरिक दाल-चावलचा आस्वाद घेत असले तरी त्या
fda


सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)।

शहरातील २०० हून अधिक हातगाड्यांवर दाल-चावलची विक्री होत असली, तरी बहुतांश ठिकाणी हा पदार्थ शाकाहारी की मांसाहारी याची स्पष्ट माहिती देणारा फलक नसल्याचे समोर आले आहे. दररोज हजारो नागरिक दाल-चावलचा आस्वाद घेत असले तरी त्याच्या गुणवत्तेची आणि घटकांची नियमित तपासणी होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

कीर्तीनगर परिसरातील एमआयडीसी हद्दीतील एका कार्यक्रमात दिलेल्या दाल-चावलमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील दाल-चावल विक्री केंद्रांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणी भाजपच्या नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शहरातील सर्व दाल-चावल विक्रेत्यांची तातडीने तपासणी करून मांसाहारी घटक किंवा प्राण्यांची चरबी वापरत असल्यास त्याची स्पष्ट माहिती फलकावर नमूद करणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील प्रत्येक दाल-चावल गाडी आणि विक्री केंद्रावर अचानक तपासणी मोहीम राबविण्याची तयारी सुरू केली आहे. सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दाल-चावल विक्रेत्यांनी त्यांच्या गाडीवर किंवा दुकानाबाहेर संबंधित पदार्थ शाकाहारी की मांसाहारी याचा फलक लावणे बंधनकारक आहे. तसेच अन्नपदार्थाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे निकष पाळणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल.

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, ग्राहकांना योग्य माहिती मिळावी आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता राखली जावी, हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande