
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रथमच 'अँटी ड्रोन सिस्टम' (अँटी ड्रोन गन) वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा वारीत कार्यान्वित करण्यात येणार आहे.
आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून संतांच्या पालख्या आणि लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या सोहळ्याचे चित्रण करण्यासाठी अनेकदा खाजगी ड्रोनचा वापर केला जातो. अशा ड्रोनमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, तसेच अनधिकृत ड्रोन उड्डाणांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी यंदा अँटी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
या अत्याधुनिक प्रणालीचे कार्य, वापर आणि कार्यपद्धती याबाबत मंगळवारी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील परेड मैदानावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रणालीचा प्रभावी वापर, सुरक्षा दक्षता आणि आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, वारकऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि अनधिकृत ड्रोनच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे, या उद्देशाने अँटी ड्रोन सिस्टम महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड