
सोलापूर, 8 जुलै, (हिं.स.)। एकेकाळी टॉवेल, चादरी आणि इतर वस्त्रोद्योग उत्पादनांच्या निर्मितीसाठी देश-विदेशात ओळख असलेला सोलापूरचा वस्त्रोद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याने तसेच मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, स्थानिक उद्योजकांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
यासोबतच पानीपत, मेरठ आणि गुजरातसारख्या औद्योगिक केंद्रांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर आणि कमी खर्चात उत्पादन होत असल्याने सोलापूरच्या पारंपरिक वस्त्रोद्योगावर स्पर्धेचा दबाव वाढला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जलद उत्पादन आणि कमी उत्पादन खर्चाचा लाभ इतर राज्यांतील उद्योगांना मिळत असल्याने स्थानिक उद्योजकांसाठी बाजारपेठेत टिकून राहणे अधिक कठीण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचाही निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. परदेशातून येणाऱ्या निर्यात ऑर्डर जवळपास ठप्प झाल्या असून देशांतर्गत बाजारपेठेतही अपेक्षित मागणी नसल्याने तयार मालाचा साठा वाढत आहे. परिणामी अनेक कारखाने मर्यादित क्षमतेने सुरू असून काही उद्योगांनी उत्पादन तात्पुरते बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे.
उद्योजकांच्या मते, वाढता उत्पादन खर्च, तीव्र स्पर्धा, निर्यातीतील मंदी आणि देशांतर्गत मागणीतील घट या सर्व घटकांमुळे सोलापूरचा टेक्स्टाईल उद्योग अभूतपूर्व अडचणीत सापडला आहे. सध्याच्या परिस्थितीत लवकर सुधारणा होण्याची शक्यता कमी असून, किमान डिसेंबरपर्यंत बाजारपेठ पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा ठेवणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड