
ठाणे, 08 जुलै, (हिं.स.)। ठाण्याच्या लुईसवाडीतील काजुवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या प्रकल्पातील १७१ पात्र झोपडीधारकांना तीन वर्षांत हक्काची घरे मिळतील, अशी ग्वाही संस्थेचे प्रमुख सल्लागार तथा माजी महापौर अशोक वैती यांनी दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक वैती यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यात साकार होत आहे.
ठाण्याच्या लुईसवाडी, काजुवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ मधील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पाच्या भुमिपूजन प्रसंगी माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, एसआरए अधिकारी मिनल पालांडे, राजकुमार पवार, सलीम सय्यद, वास्तुविशारद निलेश सावंत, ॲड. घरत, ॲड. प्रियांका सिंगारे, स्थानिक नगरसेविका वर्षा शेलार, नगरसेवक अनिल भोर, शरद कणसे, माजी नगरसेवक जितेंद्रकुमार इंदीसे, बाबा शिंदे, सुखदेव घोलप, विकासक अदिती अशोक वैती, दत्ता कदम, फैजल अन्सारी, मुस्ताक खोकर, नसरुद्दीन नाईक तसेच संस्थेचे पदाधिकारी, महिला-पुरुष सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पात १७१ पात्र झोपडीधारकांसह एका मंदिर, अशा एकूण १७२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. सहकार कायदा आणि एसआरएच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून साऊथ फिल्ड रिॲल्टी एलएलपी या विकासकाची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या सर्व प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
उच्च दर्जाच्या बांधकाम निकषांनुसार सर्व नागरी सुविधा, सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसह हा प्रकल्प उभारण्यात येणार असून,पुनर्वसित नागरिकांसाठी आधुनिक व सुरक्षित घरे, भव्य मंदिर, विद्यार्थ्यांसाठी दहावीपर्यंतची मोफत शाळा आणि विस्तारित उद्यान अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करून सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे सुपूर्द करण्यासाठी विकासक कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांमध्ये या भूमिपूजनामुळे नव्या आशा निर्माण झाल्या असून, परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर