सोलापूर - विजापूर रोडवरील लूटप्रकरणाचा छडा; तिघे गजाआड
सोलापूर, 08 जुलै, (हिं.स.)। विजापूरमधील विवाह सोहळा आटोपून बिदरकडे निघालेल्या दोघांना वडकबाळ पुलाजवळ कार अडवून डोळ्यांत चटणी टाकत लुटणाऱ्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत टमटम वाहनासह ४ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देम
सोलापूर - विजापूर रोडवरील लूटप्रकरणाचा छडा; तिघे गजाआड


सोलापूर, 08 जुलै, (हिं.स.)। विजापूरमधील विवाह सोहळा आटोपून बिदरकडे निघालेल्या दोघांना वडकबाळ पुलाजवळ कार अडवून डोळ्यांत चटणी टाकत लुटणाऱ्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत टमटम वाहनासह ४ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासात मुख्य आरोपी शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव याने त्याचा भाऊ आणि मित्राच्या मदतीने ही जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव आणि अमित ऊर्फ इंडिया हरीशचंद्र पवार यांना पोलिसांनी जेरबंद केले.

२ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मल्लिकार्जुन विश्वनाथ कोणी आणि त्यांचे मित्र शांतकुमार रेवणप्पा येडवे हे विजापूरहून बिदरकडे कारने निघाले होते. विजापूर रोडवरील वडकबाळ पुलाजवळ इंधन भरण्यासाठी ते खाली उतरले असता रिक्षामध्ये दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांची कार अडवली. आरोपींनी मल्लिकार्जुन यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांच्या डोळ्यांत चटणी टाकली आणि हातातील सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेत कारची चावी घेऊन पळ काढला.

या घटनेनंतर विजापूर नाका पोलीस ठाणे आणि शहर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. नूतन सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तिन्ही आरोपींना अटक केली.

तपासात मुख्य आरोपी शिवाजी उर्फ मरक्या जाधव याच्याविरुद्ध यापूर्वीही २०१२ मध्ये मंद्रूप पोलीस ठाण्यात आणि २०१४ मध्ये विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तब्बल १२ वर्षांनंतर त्याने पुन्हा गंभीर गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकानेही आरोपींचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

विशेष म्हणजे, शहर गुन्हे शाखेत रुजू झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली उल्लेखनीय कारवाई ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande