
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। महिलांनी आपल्या कायदेशीर हक्कांची माहिती आत्मसात करून अन्यायाविरुद्ध सजगपणे उभे राहावे. हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवून समाजात सक्षम भूमिका बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव अमोलकुमार देशपांडे यांनी केले.
महिला आरोग्य समिती, सोलापूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभवन चौक येथील समाजकल्याण सभागृहात आयोजित दोन दिवसीय महिला आरोग्य व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
देशपांडे यांनी न्याय सर्वांसाठी या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या बोधवाक्याचा उल्लेख करत प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समाजातील प्रत्येक गरजू आणि वंचित व्यक्तीला न्याय मिळावा, यासाठी प्राधिकरण कटिबद्ध असून कोणत्याही गरजू नागरिकाने मदतीसाठी प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. तसेच मोफत कायदेशीर मदतीची आवश्यकता असल्यास 15100 या टोल-फ्री क्रमांकाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ॲड. देवयानी किणगी यांनी महिलांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिला संरक्षण तसेच इतर महत्त्वाच्या कायद्यांवर मार्गदर्शन केले. ॲड. सरोजिनी तमशेट्टी यांनी महिलांशी संबंधित विविध कायदे आणि अधिकारांची माहिती देताना अन्यायाविरुद्ध प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी विधी साक्षरता अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
याशिवाय कार्यशाळेत महिला आरोग्य, महिला सक्षमीकरण, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच सामाजिक विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ही कार्यशाळा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव अमोलकुमार देशपांडे यांच्या देखरेखीखाली यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ॲड. चैतन्य केंगार, सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील पदाधिकारी, अनुसंधान साथी ट्रस्ट (पुणे), अस्तित्व फाउंडेशन (सांगोला) तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड