
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। शेतकरी आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर १० आधुनिक ॲग्री मॉल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरसह दहा ठिकाणी हे मॉल उभारले जाणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
महसूल विभागाच्या मालकीच्या उपलब्ध जागांवर हे ॲग्री मॉल उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यटन विकास अधिकारी लक्ष्मण कुसेकर यांनी दिली.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देणे, मूल्यवर्धित उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
प्रस्तावित ॲग्री मॉलमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी स्वतंत्र विक्री स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग सुविधा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, साठवण व्यवस्था, विश्रांती कक्ष आणि ग्राहकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला, धान्य, कडधान्ये, मसाले, लोणची, पापड तसेच विविध प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या विक्रीला चालना मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सोलापूर, अक्कलकोट, हैदराबाद महामार्ग परिसर, बार्शी, मंगळवेढा, तुळजापूर, मोहोळ, पंढरपूर, करमाळा आणि टेंभुर्णी या दहा ठिकाणी ॲग्री मॉलसाठी जागा निश्चित केल्या आहेत. हा प्रकल्प साकार झाल्यानंतर शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड