
मुंबई, 09 जुलै, (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई महानगरातील १०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विद्यार्थी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये एम.डी. महाविद्यालय (परळ), रुईया, पोतदार, रूपारेल, कीर्ती महाविद्यालय व पोतदार आयुर्वेदिक महाविद्यालय (दादर), सायन आयुर्वेदिक महाविद्यालय, एस.आय.एस. महाविद्यालय (सायन), झुनझुनवाला महाविद्यालय (घाटकोपर),सोमय्या महाविद्यालय ( विद्याविहार ),विवेकानंद महाविद्यालय (चेंबूर), एम.सी.सी. महाविद्यालय व वझे-केळकर महाविद्यालय (मुलुंड), चेतना महाविद्यालय (वांद्रे पश्चिम), ठाकूर महाविद्यालय (कांदिवली), चेतना महाविद्यालय( सांताक्रुज ),
मिठीबाई, साठे-डहाणू महाविद्यालय (विले पार्ले), एस.एन. महाविद्यालय (मीरा-भाईंदर) तसेच मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विविध विभागांसह अनेक महाविद्यालयांचा सहभाग होता.
गेल्या ७७ वर्षांपासून अभाविप ज्ञान, शील, एकता या ब्रीदवाक्याला अनुसरून विद्यार्थीहित, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. स्थापना दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये आजचा विद्यार्थी – आजचा नागरिक या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांना बुकमार्क व चॉकलेट वितरण, महाविद्यालयांबाहेरील नामफलकांचे अनावरण तसेच ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुंबई महानगरातील १०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये हे उपक्रम यशस्वीपणे पार पडले असून, पुढील आठ दिवस विविध विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत विद्यार्थीहिताचे कार्य पुढेही सुरू राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर