
नागपूर, ९ जुलै (हिं.स.) : एम्स नागपूरने गेल्या चार वर्षात 1,000 सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे मध्य भारतातील रुग्णांना अत्याधुनिक, किफायतशीर आणि उच्च दर्जाची अस्थिरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळाले आहे. या एकूण शस्त्रक्रियांपैकी सुमारे 20 शस्त्रक्रिया रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आल्या. यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अधिक अचूकता साधणे आणि रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम परिणाम मिळवणे शक्य झाले आहे.
या यशासाठी एम्स नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक प्रा. (डॉ.) पी. पी. जोशी यांनी अस्थिव्यंगोपचार विभागाचे अभिनंदन केले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून रुग्णांना जागतिक दर्जाची अस्थिरोग उपचार सेवा प्रदान करण्याची संस्थेची वचनबद्धता या कामगिरीतून प्रतिबिंबित होते, असे ते म्हणाले.
अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. समीर द्विडमुथे यांनी या महत्त्वपूर्ण यशाचे श्रेय आर्थ्रोप्लास्टी विभागाचे सांघिक प्रयत्न आणि खंबीर पाठिंबा देणारे भूलतज्ज्ञ, शुश्रूषा कर्मचारी, फिजिओथेरपिस्ट, शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचारी व रुग्णालय प्रशासन यांना दिले. दरम्यान, सांधे प्रत्यारोपण सेवांचे प्रभारी डॉ. सौरभ साह यांनी, प्रगत आणि प्रामाण्य आधारित सांधे प्रत्यारोपण उपचारांची उपलब्धता वाढवण्यावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपैकी 80 टक्क्यांहून अधिक शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मोफत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांनाही अत्याधुनिक रोबोटिक सांधे प्रत्यारोपण उपचार सुलभ झाले आहेत. एम्स नागपूर, कार्यशाळा, शस्त्रक्रिया प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम यांच्या माध्यमातून अस्थिव्यंगोपचार शिक्षणालाही चालना देत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी