
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.) : दूध भेसळीच्या संशयित रॅकेटविरोधात सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांनी अकलूज येथील हेमंत कार्पोरेशनचे मालक हेमंत टेके यांना अटक केली आहे. त्यांच्या गोदामातून तब्बल ९६ हजार ७८० किलो दूधपावडर जप्त करण्यात आली असून, या साठ्याची किंमत १ कोटी ३४ लाख ४६ हजार ८१ रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईदरम्यान पिलीव येथील सोनू ऊर्फ चैतन्य घोरपडे याच्याकडूनही ५१ किलो दूधपावडर जप्त करण्यात आली. दोन्ही ठिकाणांहून घेतलेले एकूण ११ नमुने अन्न व औषध प्रशासनाने रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
जप्त करण्यात आलेली दूधपावडर प्रत्यक्षात भेसळयुक्त होती की नाही, याचा अंतिम निर्णय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या तपास यंत्रणा अहवालाची प्रतीक्षा करत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले की, हेमंत टेके हे दूधपावडर विक्रीचे मोठे वितरक असून अनेक वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर दूधपावडर विक्रीचा वैध परवानाही असल्याची माहिती त्यांनी दिली.
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, टेके यांचे पूर्वी अकलूजजवळील माळेवाडी येथे गोदाम होते. काही दिवसांपूर्वी ते गोदाम बंद करून सध्या नामदेव मंगल कार्यालयामागील नव्या गोदामातून व्यवसाय सुरू होता. या गोदामात सुमारे १० प्रकारच्या पावडरचा साठा आढळून आला आहे. संबंधित पावडरचा वापर बॉडी बिल्डिंग, प्रोटीन पूरक उत्पादने तसेच दुधातील एसएनएफ (Solid-Not-Fat) चे प्रमाण वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड