
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) मार्च २०२५ मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम थकबाकीसह तत्काळ अदा करणे, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन लागू करा, यासह इतर मागण्यांसाठी आशासेविका शुक्रवारी (ता. १०) काळादिवस पाळणार आहेत. देशभरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे १० लाख आशासेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्या समाजाला मूलभूत आरोग्यसेवा पुरवतात आणि नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आशासेविका व गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ इंडियाने १० जुलै रोजी देशव्यापी जिल्हास्तरीय काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी काळी साडी, काळा सलवार सूट, काळे झेंडे आणि काळे फुगे घेऊन जिल्हा मुख्यालयावर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात येतील.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी