
शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांपर्यंत कर्जसुविधेवर व्याज सवलत
पुणे, ९ जुलै (हिं.स.) : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेअंतर्गत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
कृषी पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, प्रक्रिया केंद्रे, कस्टम हायरिंग सेंटर यांसह विविध कृषी सुविधा उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.
वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO), सहकारी संस्था, प्राथमिक कृषी पत संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट तसेच इतर पात्र संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत व अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक सुरज मडके यांनी केले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु