विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणासाठी प्रशासनाची तयारी वेगात
सेलू येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक नागरिकांना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत देण्याचे आवाहन परभणी, ९ जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अध
विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणासाठी प्रशासनाची तयारी वेगात


सेलू येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक

नागरिकांना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत देण्याचे आवाहन

परभणी, ९ जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

याअंतर्गत सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सहायक मतदार नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते.बैठकीत भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत बीएलओमार्फत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरभेटी घेऊन गणना फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सर्व पात्र मतदारांनी आवश्यक माहिती व संबंधित कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्ष, पत्रकार, अधिकारी तसेच नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले.

विशेष सखोल पुनरिक्षणानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या बैठकीस तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शिवाजी मगर, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande