
लातूर, 09 जुलै (हिं.स.)।
: शासकीय कर्तव्यावर असलेल्या महसूल अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करून टिप्परमधील गौण खनिज वाळू चोरून नेण्याची घटना उदगीर येथे घडली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं 277/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड-बिदर हायवेवरील तहसील कार्यालयासमोर, उदगीरच्या दक्षिणेस 1 किमी अंतरावर ही घटना घडली.
येथील सज्जा महसूल अधिकारी गणेश गोपीनाथराव राठोड, वय 44, हे शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात टिप्पर लावून कार्यवाही करत होते. यावेळी लोहा तालुक्यातील कदमाचीवाडी येथील आरोपी बालाजी गणेश कदम याने फिर्यादींसोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर आरोपीने तेथे लावलेला अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि त्यातील 25 हजार रुपये किमतीची अवैध गौण खनिज वाळू असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी फिर्यादी गणेश राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 221 सह महाराष्ट्र वाळू उपसा अधिनियम कलम 192(A), 194 आणि खाण खनिज अधिनियम कलम 4(1), 21 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. उदगीर शहरचे पोलीस कॉन्स्टेबल 1641 पवार हे करत आहेत. गुन्हा दाखल करणारे पोह. 778 गवारे असून पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी पो.नि. श्री भुसनूर आहेत.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून चोरीला गेलेला टिप्पर व वाळू हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis