
भूकंप व नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी
छत्रपती संभाजीनगर, ९ जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात अलीकडच्या काळात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सूचना व इशारे देता यावेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भूकंपाच्या हालचालींचे वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी भूकंपग्रस्त गावांच्या परिसरात सिस्मो मशीन बसविण्याबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या यंत्रणेमुळे भूकंपाशी संबंधित नोंदी संकलित होऊन भविष्यातील नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. पूर्वतयारीला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या जीवित व वित्तहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
बैठकीत आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत प्राप्त विविध प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारण आणि आपत्ती सौम्यीकरणाच्या दृष्टीने नालाखोलीकरण व सरळीकरणाच्या कामांबाबतही आढावा घेण्यात आला.
हिंगोली तालुक्यातील कलगाव, खांबाळा, वैजापूर, भांडेगाव तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील काकडधाबा आणि पांगरा तर्फे लाख या गावांमध्ये नालाखोलीकरण व सरळीकरणाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
दरम्यान, बैठकीत सादर करण्यात आलेल्या काही प्रस्तावांमधील अंदाजित दर बाजारभावाच्या तुलनेत अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित विभागांनी प्रत्यक्ष बाजारभावाचा आधार घेऊन वाजवी दरात सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
शासन निधीचा पारदर्शक, काटेकोर आणि परिणामकारक वापर होण्यासाठी प्रस्ताव वास्तववादी, तांत्रिकदृष्ट्या योग्य तसेच बाजारभावाशी सुसंगत असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis