
लातूर, 09 जुलै (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील गंभीर व किचकट गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध तपास करून आरोपींना जेरबंद करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे भेट देऊन जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतला. यावेळी कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, गुन्ह्यांचा तपास आणि विविध पोलीस उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मासिक आढावा बैठकीदरम्यान मागील महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून महत्त्वाची यशस्वी कारवाई केली असल्याचे निदर्शनास आले. या कामगिरीची दखल घेत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी उमाप यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही तत्परता, व्यावसायिकता आणि लोकाभिमुख पोलीसिंगच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis