
रायगड, 09 जुलै, (हिं.स.) : शैक्षणिक प्रवेशाची अंतिम मुदत जवळ आल्याने अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात विविध प्रकारचे सुमारे ३५० दाखले मंजुरीअभावी प्रलंबित राहिले होते. प्रांताधिकारी मुकेश चव्हाण आजारी असल्यामुळे दाखल्यांच्या मंजुरीची प्रक्रिया रखडली होती. या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार महेंद्र दळवी यांनी तातडीने प्रांताधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न मांडला आणि दाखले मंजूर करण्याची विनंती केली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची जाणीव ठेवत आजारी अवस्थेतही प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे सर्व प्रलंबित दाखल्यांना मंजुरी दिली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले दाखले वेळेत उपलब्ध झाले आणि सुमारे ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले.
दाखले मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक महाविद्यालयांच्या प्रवेशाची अंतिम मुदत जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
आजारी असतानाही विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत दाखले मंजूर केल्याबद्दल प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांचे तसेच प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रशासनाशी समन्वय साधल्याबद्दल आमदार महेंद्र दळवी यांचे पालकांनी आभार मानले. दरम्यान, एखादा अधिकारी अनुपस्थित असताना शासकीय कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी पर्यायी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा या घटनेनिमित्त पुन्हा पुढे आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)