
नाशिक, 09 जुलै (हिं.स.)।
- कार्यक्रमाचे मानधन घेऊनही वेळेवर उपस्थित न राहिल्याने अभिनेत्री मोसमी चटर्जीला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून दंडाची शिक्षा सुनावली आहे यामुळे कार्यक्रमाला येण्याची आश्वासन देऊनही मानधन घेऊन न येणाऱ्या कलावंतांना तसेच वेगवेगळ्या स्टार लोकांना मोठा फटका बसणार आहे
आजकाल ल बऱ्याच कार्यक्रमांसाठी अनेकदा सेलिब्रेटींना आमंत्रित केले जाते. सेलिब्रेटी या उपस्थितीची मानधन ही घेत अ सतात. परंतु कधी कधी मानधन घेऊनही काही सेलेब्रिटी कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याने आयोजकांचे मोठे नुकसान होते. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारूनही ऐनवेळी पाठ फिरवणाऱ्या अभिनेत्रीला नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. मानधन स्वीकारणारा सेलिब्रिटी हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत 'सेवा पुरवठादार' मानला जाऊ शकतो आणि अशा सेवांनाही ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ लागू होतो, असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आयोगाने दिला आहे.
याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीयांनी घेतलेले ३ लाख ९ टक्के व्याजासह परत करावेत, तसेच १ लाख नुकसानभरपाई आणि २५ हजार तक्रार खर्च म्हणून तक्रारदाराला द्यावेत, असा आदेश आयोगाने दिला आहे.
तक्रारदार डॉ. अरुणा वानखेडे यांनी गोवा येथे त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहण्यासाठी त्यांनी अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना निमंत्रित केले होते आणि त्यासाठी ३ लाख इतके मानधन आगाऊ दिले होते.
विशेष म्हणजे, मौसमी चॅटर्जी या गोव्यात पोहोचल्या, मात्र तरीही त्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. सेलिब्रिटींच्या या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचे नियोजन कोलमडले, आयोजकांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. याविरुद्ध डॉ. वानखेडे यांनी नाशिक जिल्हा ग्राहक आयोगात दाद मागितली होती.
दरम्यान, या प्रकरणात तक्रारदार डॉ. अरुणा वानखेडे यांच्यावतीने अॅड. दीप्ती विद्देश नाशिककर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कायदेतज्ज्ञांच्या मते, ग्राहक चळवळीला बळ देणारा आणि सेलिब्रिटींना जबाबदारीची जाणीव करून देणारा हा निर्णय अत्यंत मार्गदर्शक ठरेल.
या प्रकरणाची सुनावणी आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा एस. डेल्हारकर, सदस्या सौ. प्रेरणा लोणकर आणि सौ. कविता ए चव्हाण यांच्या न्यायासनासमोर झाली. दोन्ही बाजूंचे दस्तऐवज आणि पुरावे तपासल्यानंतर आयोगाने मौसमी चॅटर्जी यांच्या कडून 'सेवेत त्रुटी' झाल्याचे स्पष्ट केले.
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी स्वीकारलेली ₹३ लाखांची रक्कम १८ नोव्हेंबर २०२३ पासून ९% वार्षिक व्याजासह तक्रारदाराला परत करावी. तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी ₹१ लाख नुकसानभरपाई द्यावी. तक्रार खर्चापोटी अतिरिक्त ₹२५ हजार अदा करावेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV