लातूर दुहेरी खून प्रकरण; तिघांना जन्मठेपेची शिक्षा
लातूर, 09 जुलै (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील कासार सिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्तुरी येथे वाटणीच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कासार सिरसी पोलिसांनी केलेला शास्त्रशुद्ध तपास आणि
कोर्ट (प्रतीकात्मक)


लातूर, 09 जुलै (हिं.स.)।

लातूर जिल्ह्यातील कासार सिरसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्तुरी येथे वाटणीच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कासार सिरसी पोलिसांनी केलेला शास्त्रशुद्ध तपास आणि सरकार पक्षाने सादर केलेले भक्कम पुरावे या निकालात निर्णायक ठरले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. पवार यांनी गुरुवारी दिलेल्या निकालात बस्वराज आन्यप्पा बिराजदार, लखन आन्यप्पा बिराजदार आणि सुनिल आन्यप्पा बिराजदार (रा. उस्तुरी) या तिन्ही आरोपींना भारतीय न्याय संहिता कलम १०३ सह ३(५) अंतर्गत प्रत्येकी जन्मठेप व १० हजार रुपये दंड, तसेच कलम १०९ सह ३(५) अंतर्गत सात वर्षे सक्त कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

प्रकरणातील माहितीनुसार, उस्तुरी येथील सुरेश आन्यप्पा बिराजदार हे मुलांसह शेतात काम करत असताना वाटणीच्या जुन्या वादातून आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश बिराजदार व त्यांचा मुलगा साहिल बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर मयत सुरेश बिराजदार यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीवरून कासार सिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३, १०९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी केला. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर महत्त्वाचे साक्षीपुरावे संकलित करून आरोपींविरुद्ध सबळ दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची सुसंगत साक्ष आणि तपासातील पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कोर्ट पैरवी कर्मचारी आय. डी. चेळकर आणि कार्यालय सहाय्यक एच. जी. बिरादार यांनी सहकार्य केले.

कासार सिरसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या काटेकोर तपासामुळे आणि सरकार पक्षाने न्यायालयात सादर केलेल्या ठोस पुराव्यांमुळे आरोपींना कठोर शिक्षा झाली. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात प्रभावी पोलीस तपास आणि सक्षम न्यायालयीन पाठपुराव्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा निकाल मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande