नॉनक्रिमिलेअर, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र बनावट
दोघांच्या नोकऱ्या धोक्यात : सेतू केंद्र संचालकावर गुन्हा अमरावती, 09 जुलै (हिं.स.)। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकाने शासकीय नोकरी, तर दुसरा पोलिस दलात दाखल झाला. त्या दोघांच्या नॉनक्रिमिलेअर व इडब्ल्यूएस प्रमाणपत्रांची तपासणी केली असता, ते बन
नॉनक्रिमिलेअर, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र बनावट


दोघांच्या नोकऱ्या धोक्यात : सेतू केंद्र संचालकावर गुन्हा

अमरावती, 09 जुलै (हिं.स.)।

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकाने शासकीय नोकरी, तर दुसरा पोलिस दलात दाखल झाला. त्या दोघांच्या नॉनक्रिमिलेअर व इडब्ल्यूएस प्रमाणपत्रांची तपासणी केली असता, ते बनावट निघाले आहे. शहर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणात सेतू केंद्र संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमरावती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वीणा विलास चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित रूपेश भागवत (रा. अंबागेट) या सेतू केंद्र संचालकाविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी सांगितले. एमपीएससीमार्फत नियुक्ती मिळविलेल्या युवकाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व उत्पन्न दाखला पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयाला जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र प्राप्त झाले होते. त्या पत्रासोबत अर्जदाराचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्याची एमपीएससीमार्फत निवड झाली आहे. सदर व्यक्तीने एमपीएससीची जाहिरात निघाली होती, त्यावेळेस सेतू केंद्र चालविणारा संशयित रूपेश भागवत याने युवकास नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिले होते. त्यावर तपशील आणि बारकोडही होता. सदर युवकाच्या वडिलांचेही उत्पन्न प्रमाणपत्र जोडले होते. सदर दस्तऐवजाची तपासणी केली असता, तहसील कार्यालयाकडून त्यास हे प्रमाणपत्र देण्यातच आले नसल्याचे उघडकीस आले. ऑनलाइन अर्ज सेतू केंद्रामार्फत न करता, सदर प्रमाणपत्र तयार केल्याची गंभीर बाब उघडकीस आली. याव्यतिरिक्त नागपूर पोलिसमध्ये इडब्ल्यूएस कोट्यातून अन्य दुसऱ्या युवकाची निवड झाली आहे. त्याचेही इडब्ल्यूएस प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडे तपासणीकरिता आले होते. ते सुद्धा सेतू केंद्र संचालक रूपेश भागवत याने ऑनलाइन अर्ज न करता परस्परच तयार करून दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संशयित रूपेश भागवत याने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अमरावती यांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दोघांनाही देऊन फसवणूक केल्याचे नायब तहसीलदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्याआधारे रूपेश भागवत विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande