
सोयाबीन बियाणे निकृष्ट, कारवाईची मागणी
अमरावती, 09 जुलै (हिं.स.)
यंदाच्या खरीप हंगामात धामणगावरेल्वे तालुक्यात बोगस व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वकनाथ येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पेरणीनंतर एकही दाणा उगवला नसल्याने त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. वकनाथ येथील शेतकरी जितेंद्र यादवराव सावरकर यांनी पुलगाव येथील कृषी सेवा केंद्रातून एका कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. २९ जून रोजी सर्वे क्रमांक २३ मधील शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यात आली. मात्र आठ दिवस उलटल्यानंतरही शेतात एकही रोप उगवले नाही. विशेष म्हणजे, त्याच दिवशी शेजारच्या शेतकऱ्यांनी इतर कंपन्यांचे बियाणे पेरले असून त्या शेतांमध्ये उगवण समाधानकारक झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी सावरकर यांचे संपूर्ण शेत पडीत पडले असून त्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार आहे. यासंदर्भात त्यांनी कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे आणि देवळी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनी व कृषी सेवा केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी