धोकादायक रुग्णालय इमारतीची पाहणी; सुविधांसाठी नगराध्यक्षा रस्त्यावर
रायगड, 09 जुलै (हिं.स.)। अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि रुग्णांच्या गैरसोयींची दखल घेत नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी रुग्णालयाची पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरले. पाहणीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित
धोकादायक रुग्णालय इमारतीची पाहणी; सुविधांसाठी नगराध्यक्षा रस्त्यावर


रायगड, 09 जुलै (हिं.स.)। अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि रुग्णांच्या गैरसोयींची दखल घेत नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी रुग्णालयाची पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरले. पाहणीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देत रुग्णालयातील महत्त्वाचे विभाग जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न करण्याची ठाम मागणी केली.

पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे, अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचे तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. काही कर्मचारी व परिचारिकांकडून नागरिकांशी उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी भूमिका नगराध्यक्षा नाईक यांनी मांडली.

जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक ठरत असताना महत्त्वाचे विभाग स्थलांतराच्या उंबरठ्यावर असून रायगडच्या पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता नागरिकांच्या आरोग्य हक्कासाठी मैदानात उतरत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली.

निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभाग तसेच पीएमसी आणि केएमसी वॉर्ड असलेली इमारत धोकादायक असल्याचे नमूद केले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी हे विभाग तात्पुरते सुरक्षित इमारतीत हलविण्यास विरोध नसला तरी त्यांचे पेण किंवा पनवेल येथे स्थलांतर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्षा नाईक यांनी मांडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande