मुख्यमंत्र्यांकडे धाव; मंगळवेढ्यातील जुगार-मटका बंद करण्याची मागणी
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)। मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील अवैध दारू विक्रीविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर आता मंगळवेढा शहरातील मटका आणि जुगाराचे अवैध अड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी
hgf


सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)।

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील अवैध दारू विक्रीविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर आता मंगळवेढा शहरातील मटका आणि जुगाराचे अवैध अड्डे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गृहमंत्रीपदाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांकडे असल्याने या मागणीची शहर व तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भातील निवेदन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांनाही देण्यात आले आहे. निवेदनात शहर तसेच परिसरातील अनेक पानटपऱ्यांवर खुलेआम अवैधरित्या मटका सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही एजंट मोबाईलच्या माध्यमातूनही मटका स्वीकारत असल्याने या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, या अवैध व्यवसायांमुळे अनेक गरीब कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून अनेक नागरिक कर्जबाजारी झाले आहेत. काहींना आपली जमीन व स्थावर मालमत्ता विकण्याची वेळ आल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच शहरालगतच्या काही हॉटेल्स आणि आडोशाच्या ठिकाणी जुगाराचे अड्डेही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय, अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ती गोपनीय ठेवली जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे माहिती देणाऱ्या व्यक्तींना संबंधित अवैध धंदेवाल्यांकडून त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करत, यापुढे माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवावी आणि शहरातील मटका व जुगार अड्ड्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande