
बीड, 09 जुलै (हिं.स.)। ठेवीदारांचा कष्टाचा पैसा त्यांना मिळावा, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, बीड येथील सभासद ठेवीदारांच्या ठेवी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
तसेच,बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, छत्रपती मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, राजस्थानी, मराठवाडा अर्बन (माजलगाव), लक्ष्मीमाता अर्बन, मुक्ताई अर्बन, शुभकल्याण मल्टीस्टेट, परिवर्तन मल्टीस्टेट, मंगलनाथ अर्बन, गंगाभारती पतसंस्था,या बँका संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ठेवी सर्वसामान्यांना वितरीत करण्यात आलेल्या नाहीत.
गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सातत्याने सभागृहात आवाज उठवत असून संबंधित स्तरावर पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis