मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू
पुणे, ९ जुलै (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचावकार्यात आतापर्यंत नऊ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आज (
grdf


पुणे, ९ जुलै (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचावकार्यात आतापर्यंत नऊ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आज (९ जुलै) सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या एका नागरिकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असून, अद्याप आठ नागरिकांचा शोध सुरू आहे.

मोशी कचरा डेपोत बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कचऱ्याचा मोठा ढीग प्रशासकीय इमारतीवर कोसळला. त्यावेळी इमारतीत सुमारे २३ नागरिक उपस्थित होते. दुर्घटनेनंतर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे पाच जण स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले, तर उर्वरित १८ जण ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन विभाग, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने बचावकार्य सुरू केले.

बुधवारी रात्रीपर्यंत सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह या सहा जणांना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या मोहिमेत विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांचीही यशस्वी सुटका करण्यात आली. अशा प्रकारे बचावकार्यात एकूण नऊ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

आज सकाळी सुमारे ९ वाजता एनडीआरएफच्या श्वान पथकाच्या मदतीने सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान भावेश वाणी यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

सध्या घटनास्थळी अद्याप अडकलेल्या आठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव आणि शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande