
लातूर, 09 जुलै, (हिं.स.)। निलंगा शहरातील प्रभाग क्रमांक 03 मथुरा नगर येथील आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राला नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांनी सदिच्छा भेट देत तेथील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची पाहणी केली.
यावेळी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावे अशी सूचना करण्यात आली.
नगराध्यक्षांनी केंद्रातील स्वच्छता, औषधांचा साठा, विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी नगरसेवक श्री ईश्वर पाटील श्री हरिभाऊ सगरे, सौ सुधाताई वाघमारे सौ मीनाक्षीताई देशपांडे डॉक्टर प्रदीप जाधव सर,डॉक्टर ऐश्वर्या निंबाळकर आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी नगरपालिका आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी यावेळी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis