आळंदीत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम- माधव खांडेकर
पालखी सोहळ्यानंतर 400 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती पुणे, ९ जुलै (हिं.स.) : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आणि पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर आळंदी नगर परिषदेमार्फत संपूर्ण शहरात स्वच्छता व निर्जंत
Jsjs


पालखी सोहळ्यानंतर 400 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पुणे, ९ जुलै (हिं.स.) : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आणि पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर आळंदी नगर परिषदेमार्फत संपूर्ण शहरात स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

पालखी सोहळ्यादरम्यान लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नगर परिषदेमार्फत मध्यरात्रीच्या वेळेतही साफसफाई, कचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्थेची कामे सातत्याने करण्यात आली. ज्या ठिकाणी दिंड्यांचे मुक्काम होते, जर्मन हँगर उभारण्यात आले होते तसेच मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती, त्या सर्व परिसरांची तातडीने स्वच्छता करून ते पूर्ववत करण्यात आले आहेत.

सध्या आळंदी शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू असून, अलीकडील पूरस्थितीमुळे घाट परिसर आणि नदीकाठावर साचलेला गाळ, कचरा तसेच जलपर्णी हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. या मोहिमेसाठी सुमारे ४०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जेसीबीच्या सहाय्याने घाट परिसरातील गाळ व जलपर्णी हटविण्यात येत आहे.

शहरातील निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे आणि बीएचसी पावडरची फवारणी करण्यात येत आहे. तसेच दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक औषधांचाही वापर केला जात आहे. रस्त्यांवर साचलेला गाळ आणि कचरा हटवून अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सहाय्याने रस्ते स्वच्छ धुतले जात आहेत.

पूरपरिस्थितीमुळे अनेक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये गाळ साचला होता. अशा ठिकाणीही नगर परिषदेमार्फत स्वच्छता करण्यात येत असून, दुर्गंधी दूर करण्यासाठी ओडोफ्रेशसह आवश्यक औषधांची फवारणी केली जात आहे. शहरातील कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि अडथळामुक्त राहावा यासाठी संपूर्ण पालखी मार्ग रातोरात स्वच्छ करण्यात आला. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक सुरक्षितता यांना प्राधान्य देत आळंदी नगर परिषदेकडून आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत.

नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि स्वच्छता निरीक्षक दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि पूरपश्चात पुनर्स्थापनेची कामे सुरू आहेत. सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून शहरातील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande