
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्त वर्षा लड्ढा यांच्या जागी डॉ. मंगेश गोंदावले यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन, वित्त आणि विकास क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी झालेल्या विशेष संवादात त्यांनी शहराच्या विकासाची दिशा स्पष्ट केली.कोणत्याही शहराचा विकास करण्यापूर्वी त्या शहराची नाडी समजून घेणे आवश्यक असते, असे सांगत डॉ. गोंदावले यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम शहराची प्रत्यक्ष पाहणी, विविध विभागांचा आढावा आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यानंतरच प्राधान्यक्रम निश्चित करून विकासकामांना गती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. महापालिका केवळ वित्त आयोगाच्या निधीवर चालू शकत नाही. स्वबळावर महसूल वाढविणे, करसंकलन अधिक प्रभावी करणे, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे आणि आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिकाच नागरिकांना दर्जेदार सुविधा देऊ शकते, असे त्यांनी सांगितले.कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त आणि विद्यमान महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून सुरू असलेल्या विकासकामांचा, प्रलंबित प्रकल्पांचा आणि आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाईल. सुरू असलेल्या कामांमध्ये सातत्य राखत आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्यावर भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गोंदावले यांनी यापूर्वी गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना सिंचन प्रकल्पांना गती, रोजगारनिर्मिती आणि विविध विकासकामांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी शेतकरीहिताचे अनेक उपक्रम राबविले. अर्थव्यवस्था आणि आर्थिक समावेशीकरण या विषयांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण लेखनही प्रशासकीय क्षेत्रात विशेष मानले जाते. त्यांनी इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स या विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून, अमरावती महापालिका आयुक्तपदी नियुक्तीपूर्वी त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोमध्ये संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, त्यामध्ये बदल करून त्यांना अमरावती महापालिकेची जबाबदारी देण्यात आली.
अमरावतीचा विकास हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम नसून त्यात नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छ, सक्षम आणि विकासाभिमुख अमरावती घडविण्याचा माझा संकल्प आहे, असा विश्वास डॉ. मंगेश गोंदावले यांनी व्यक्त केला.
-----------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी