रत्नागिरी : सुरक्षेच्या कारणास्तव रघुवीर घाट पर्यटनासाठी १० ऑगस्टपर्यंत बंद
रत्नागिरी, 9 जुलै (हिं.स.) । पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट आजपासून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्हे जोडणाऱ्या या अवघट घाटात डोंगर भागात दरड को
रत्नागिरी : सुरक्षेच्या कारणास्तव रघुवीर घाट पर्यटनासाठी १० ऑगस्टपर्यंत बंद


रत्नागिरी, 9 जुलै (हिं.स.) । पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट आजपासून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे.

रत्नागिरी आणि सातारा जिल्हे जोडणाऱ्या या अवघट घाटात डोंगर भागात दरड कोसळण्याची आणि जीवित हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६१ (रघुवीर घाट) च्या साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. कि.मी. १००/५०० ते १०५/५०० मध्ये डांबरी पृष्ठभाग आणि बाजूपट्टी खचली आहे. रस्त्यावर माती व दगड आले असून डांबरी रस्त्याला तडे जाण्याची आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्यांना घाटातून जाण्याची परवानगी आहे. याशिवाय सर्व प्रकारची जड वाहने, इतर सर्व प्रकारची खासगी वाहने घाटात नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. पर्यटकांना घाटातील पर्यटनस्थळांवर थांबण्यास आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे

नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande