घरकुल लाभार्थ्यांसाठी जागा, मोफत वाळू प्रस्ताव तातडीने सादर करा- जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : ग्रामीण आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमित जमिनीवरील घरे नियमानुकूल करणे तसेच बांधकामासाठी पाच ब्रा
घरकुल लाभार्थ्यांसाठी जागा, मोफत वाळू प्रस्ताव तातडीने सादर करा- जिल्हाधिकारी


छत्रपती संभाजीनगर, 9 जुलै (हिं.स.) : ग्रामीण आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर हक्काचे घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमित जमिनीवरील घरे नियमानुकूल करणे तसेच बांधकामासाठी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व ग्रामविकास विभागाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम., समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (ग्रामीण विकास यंत्रणा) वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

बैठकीत ग्रामीण आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव, आराखडे आणि आवश्यक कागदपत्रे तातडीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. शासकीय किंवा गायरान जमिनीवरील घरांना शासन निर्णयानुसार नियमानुकूल करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासह वनविभागाच्या अखत्यारीतील जमिनींसाठी आवश्यक परवानग्या तातडीने मिळविण्याचे निर्देशही देण्यात आले.

घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाजवळील शासकीय वाळू डेपोतून वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महसूल व ग्रामविकास विभागाने समन्वयाने पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रस्तावांतील त्रुटी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी मिळावी, यासाठी मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मोहीम स्वरूपात काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांनी ग्रामीण भागातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम. यांनी 'नशामुक्त अभियान', 'बालविवाहमुक्त संभाजीनगर' आणि 'कुपोषणमुक्त बालक' या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

यावेळी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील घरकुलासाठी मंजूर झालेल्या गायरान जमिनी ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी. एम. यांच्याकडे सुपूर्द केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande