
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)। जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या जोरावर सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव मनोहर चौगुले यांनी अवघ्या १० एकर डाळिंब बागेतून सुमारे २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत शेती क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना प्रतिष्ठेचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार जाहीर केला आहे.
दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यात शेती करणे हे मोठे आव्हान मानले जाते. मात्र, शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता उद्योगाच्या दृष्टीने पाहण्याचा निर्धार सदाशिव चौगुले यांनी केला. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा अभ्यास करून त्यांनी डाळिंब लागवडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला.
डाळिंब पिकावर रोगराई, किडींचा प्रादुर्भाव, उत्पादनातील चढ-उतार आणि बाजारातील अनिश्चितता अशा अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांनी हार मानली नाही. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन, माती व पाणी परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, वेळेवर छाटणी आणि प्रभावी रोगनियंत्रण या शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब करत त्यांनी बागेची गुणवत्ता आणि उत्पादनात सातत्य राखले.
डाळिंब शेतीतील उत्कृष्ट व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनातील सातत्य, कृषी क्षेत्रातील नवोपक्रम आणि इतर शेतकऱ्यांना दिलेले मार्गदर्शन या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांची ‘उद्यान पंडित’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्कारामुळे जुजारपूर गावासह संपूर्ण सांगोला तालुक्याचा गौरव झाला असून, प्रगतशील आणि वैज्ञानिक शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सदाशिव चौगुले यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड