
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.) होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी तब्बल १,८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने राज्य शासनाने आता बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळाचा पर्याय पुन्हा गांभीर्याने विचारात घेतला आहे. विशेष म्हणजे, बोरामणी येथे केवळ सुमारे ५०० कोटी रुपयांत आधुनिक विमानतळ विकसित करून नाईट लँडिंगसह नियमित विमानसेवा सुरू करणे शक्य असल्याचे समोर आले आहे.होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा विकसित करण्यासाठी मजरेवाडी आणि कुमठे परिसरातील सुमारे ५० एकर अतिरिक्त जमीन संपादित करावी लागणार आहे. याशिवाय सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जुनी चिमणी आणि कारखान्याची संरचना हटविणे, परिसरातील अतिक्रमणे दूर करणे तसेच अत्याधुनिक नाईट लँडिंग उपकरणे बसविणे आवश्यक आहे. या सर्व कामांसाठी सुमारे १,८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, बोरामणी येथे यापूर्वीच संपादित करण्यात आलेल्या जागेवर विमानतळ उभारण्यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे कमी खर्चात आधुनिक सुविधा असलेले विमानतळ विकसित करण्याचा पर्याय शासनासाठी अधिक व्यवहार्य ठरत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.दरम्यान, बोरामणी विमानतळ प्रकल्पातील प्रमुख अडथळा मानल्या गेलेल्या माळढोक पक्ष्याच्या अस्तित्वाबाबत फेरसर्व्हे करण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व्हेनंतर प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. राजकीय कारणांमुळे अनेक वर्षे बोरामणी विमानतळाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. मात्र, वाढता खर्च, तांत्रिक अडचणी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता शासनाने आता बोरामणी विमानतळाचा पर्याय पुन्हा सक्रिय करण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड