
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)।
सोलापूर शहराच्या विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) प्रस्तावित करण्यात आलेल्या १२० किलोमीटर लांबीच्या ७४ नव्या नाल्यांच्या आरक्षणाला नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. या प्रस्तावामुळे शहरातील विकासकामांवर मोठा परिणाम होणार असून अनेक जागा विनाकारण बाधित होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत आरक्षण रद्द करण्याबाबत ठराव मंजूर करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र काळे यांनी दिली.
महापालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत नरेंद्र काळे यांनी या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव उपस्थित होते. त्यांनीही या भूमिकेला पाठिंबा देत प्रस्तावित नाल्यांच्या नियोजनाबाबत गंभीर आक्षेप नोंदविले.
काळे यांनी सांगितले की, शहरातील ७४ नवीन नाले विकास आराखड्यात समाविष्ट करताना नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या नाहीत. तसेच नाल्यांचे नियोजन करताना आवश्यक नकाशे, भूस्तर (लेव्हल्स) आणि तांत्रिक निकषांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या विषयावर प्रशासनाने स्वतःहून प्रस्ताव न आणल्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या माध्यमातून स्वतंत्र ठराव मांडून ७४ नाल्यांचे आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या मालमत्तांवर आणि शहराच्या भविष्यातील विकासावर या आरक्षणाचा परिणाम होणार असल्याने विकास आराखड्याचा फेरविचार करून तांत्रिकदृष्ट्या योग्य नियोजन करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड