
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने गर्भवती महिलेच्या पतीशी केस पेपर देण्यावरून अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून रुग्णालय प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती महिला उपचारासाठी पतीसोबत शासकीय रुग्णालयात आली होती. केस पेपर काढण्यासाठी दोघे रांगेत उभे असताना, संबंधित कर्मचाऱ्याने किरकोळ कारणावरून महिलेच्या पतीशी वाद घातल्याचा आरोप आहे. तसेच, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत केस पेपर देत नाही, काय करायचे ते करा, अशी अरेरावी केल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने खिडकीसमोर खिडकी बंद आहे असा फलक लावून तेथून निघून गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे रांगेत बराच वेळ उभे असलेल्या गर्भवती महिलेसह इतर रुग्णांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून रुग्णालय प्रशासनाने यावर ठोस धोरणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक यांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड