सिंहस्थ कुंभ २०२७ : दर्जेदार रस्ते उभारणीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाचा पुढाकार
नाशिक, 09 जुलै (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच कामांच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक पद्धती
Simhastha Kumbh 2027:


नाशिक, 09 जुलै (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच कामांच्या प्रत्येक टप्प्यावर वैज्ञानिक पद्धतीने गुणवत्ता तपासणी व्हावी, या उद्देशाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने विविध यंत्रणांतील अभियंत्यांसाठी ऑनलाइन तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन केले. या प्रशिक्षणास कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह तसेच कुंभमेळा प्राधिकरण उपआयुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी उपस्थित होते.

या प्रशिक्षणात आयआयटी बॉम्बेचे प्रा. डॉ. धर्मवीर सिंह यांनी मार्गदर्शन केले. डेंस बिट्युमिनस मॅकॅडम (DBM) आणि बिट्युमिनस काँक्रीट (BC) रस्त्यांच्या थरांची घनता (Density) तपासण्याच्या वैज्ञानिक पद्धती, आधुनिक गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, चाचणीची अचूक प्रक्रिया आणि दर्जेदार रस्ते उभारणीसाठी आवश्यक अभियांत्रिकी निकष याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. रस्त्यांची मजबुती, टिकाऊपणा आणि दीर्घकालीन कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी घनता तपासणी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या ऑनलाइन प्रशिक्षणात सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी), नाशिक महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम विभाग), त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि शिर्डी नगर परिषद येथील अभियंते व अधिकारी सहभागी झाले.

यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक काम निर्धारित अभियांत्रिकी मानकांनुसार होत असल्याची खात्री करून वैज्ञानिक चाचण्या आणि गुणवत्ता तपासणीमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, असे त्यांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयआयटी बॉम्बेसारख्या अग्रगण्य तांत्रिक संस्थांच्या सहकार्याने विविध विषयांवरील क्षमता विकास आणि तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने आयोजित करत आहे. या उपक्रमांमुळे विविध यंत्रणांमधील अभियंत्यांचे तांत्रिक कौशल्य वाढण्यास मदत होणार असून कुंभमेळ्यासाठी उभारली जाणारी पायाभूत कामे अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि टिकाऊ होतील, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande